The Musty Pool of Expectations | अपेक्षांचं कुबट थारोळं

By and | 1 October 2016

ही दुःखं अशी ब्लॉक होऊन बसलेली
रक्तवाहिन्यांमधून कधीची …
श्वासही घेता येत नाहीये धड
आणि जीव तर असा
पार कोंडून कोंडून गेलेला

बायको, आई, प्रेयसी, मैत्रीण
ही माझीच प्रतिरुपं अनेक
आतड्याच्या पिळानं
जगलेली उत्कट,
वेडावून दाखवताहेत मला
हिंस्त्र भेसूर

‘शेवट क्रांतिकारक का नाही केलास?’
‘बाई सारखंच लिहीत राहा!’
‘तू वापरायला हवास,
बौद्ध संस्कृतीचा प्रिझम’
‘कशाला इतकं ‘बिटर’ लिहितेस?
लिही ना इंद्रधनुषी काही!’

आवाज ऐकू येतात
कधीही कुठेही…
दिवसाढवळ्या
रात्री अपरात्री
भर रस्त्यात
एकान्तात
प्लॅटफॉर्मवर
किंवा स्वप्नात

हे ओघळतंय सतत
कधीचं साचून राहिलेलं अपेक्षांचं कुबट थारोळं
असह्य वास मारणारं.

निवडीचं स्वातंत्र्य?
एक चकाकतं दुर्मीळ
स्फटिक
कधीच हाती न येणारं!

This entry was posted in 76: DALIT INDIGENOUS and tagged , . Bookmark the permalink.

Related work:

  • No Related Posts Found

Comments are closed.